बॉब जार्डीन
रॉबर्ट जार्डीन हा वेस्ट इंडिजमधल्या बार्बाडोस येथील आमच्या स्टेडियमचा आर्किटेक्ट. स्थानिक असल्याने बेजन म्हणायचे पण मूळ आयरिश वंशाचा . गोरापान रंग, नेहमीच हाफ शर्ट इन केलेला, हसरा चेहरा हि ठळक वैशिष्ट्ये. मी पाहत असलेल्या थ्री डब्लू स्टेडियमच्या फिनिशिंग कामानिमित्ते साईटवर नेहमीच भेट व्हायची.
दुसऱ्याचा वेळ फुकट जाऊ द्यायचा नाही आणि दुसऱ्यावर आपला किमती वेळ फुकट घालवायचा नाही हे तत्व अगदी काटेकोरपणे पाळणारा.
साईट ऑफिसात जुजबी बोलणे झाले कि लगेच आम्ही काम पाहायला जात असू. तिथेही काही अडचण असेल तर सोल्युशन लगेच मिळे.त्याचे शिक्षण कुठे झाले होते ठाऊक नाही पण कमानकलाकाराला (रोमन संस्कृतीत आर्च म्हणजे कमान बांधण्याच्या माहितीतून आर्किटेक्चर म्हणजे कमानकला हा शब्द आला असे वाचले होते कुठेतरी!) आवश्यक असलेले, एखादी वास्तू वापरणाऱ्यांच्या नजरेतून पाहण्याचे ज्ञान वाखाणण्याजोगे होते.
दोन इंच व्यासाचा पाईप भिंतीला लावून जिन्याच्या दोन्ही बाजूला केलेलं हँडरेल. हे काम सर्टिफाय करायला मी बॉबला घेऊन स्टॅण्डवर गेलो. सर्व वेल्डिंग जागचे व्यवस्थित ग्राइंडिंग वगैरे पाहून जिना उतरत असताना एका जागी तो थांबला.
मला म्हणाला कि इथे हात धरून बघ.
मी सहजच बोललो कि काय विशेष, या जागी गोल कॉलम पुढे आल्याने गॅप जरा कमी झालीये इतकेच.
त्यावर त्याचे उत्तर होते- हे तू सांगू शकतोस कारण तुला दिसते आहे. इमॅजिन एखादा आंधळा माणूस जिना चढतो आहे आणि अचानक त्याची बोटे अडकल्यागत झाली तर त्याला समजणार नाही काय गडबड आहे.
“मग? कॉलम काही मागे होऊ नाही ना शकत!”
“खरंय , पण पाईप एक इंच दूर जाऊ शकतोच. प्लिज पाईप काढून पुन्हा लावून घ्या, आणि अशी जागा जिथे येईल तिथे मला न विचारता हा बदल करा. कारण एका इंचाने जिन्याच्या रुंदीत काही खास फरक पडणार नाही पण इथे येणाऱ्या एका क्रिकेटरसिकालासुद्धा त्रास होता काम नये.”
आमच्या थ्री डब्ल्यू स्टॅन्ड चे गोल कॉलम हे त्याचे रचनात्मक सौंदर्य. डोळ्यात तेल घालून काँक्रीट करूनही काही प्रमाणात अतिसूक्ष्म छिद्रे राहिली होती ज्याचा स्टँडला काहीच त्रास होणार नव्हता. पण एकदा भारतातून एक मोठे साहेब आले आणि त्यांनी आदेश दिला कि जर मनाजोगते फिनिशिंग येत नाही तर सिमेंटच्या जवळची शेड निवडून पेंट करून घ्या. पेमेंट केले तर ठीक नाही आपल्या खर्चाने. शेवटी हे स्टेडियम एक प्रतिष्ठेचे प्रोजेक्ट आहे कम्पनीसाठी.
बेटावर उपलब्ध असलेली कोणतीच शेड बरोबर वाटेना. अखेरीस मी युनिव्हर्सल शेड बुकलेट मागवले आणि त्यातल्या दोन शेड्स वर आमचे म्हणजे मी आणि बॉब यांचे एकमत झाले. किस्सा त्यापुढचा आहे. बॉबने दोन्ही शेड्स समोर धरल्या आणि मला म्हणाला, तू सांगशील ती शेड आपण लावू! अधिकार गाजवणे आणि अधिकार सजवणे यातला फरक मला तिथे दिसला.
सदा हसऱ्या चेहऱ्याच्या बॉबला एकदाच मी चिडलेले पहिले होते. एका शनिवारी आम्ही साईटवर फिरत होतो. एक बेजन माझ्याकडे काहितरी काम पाहिजे म्हणून आमच्या मागून मागून येत होता. त्याच्या चालीवरून तो प्यायलेलाही वाटत होता. मी बऱ्या भाषेत त्याला टाळून पाहिले पण तो हटेचना. अखेर बॉबने त्याला चढ्या आवाजात सांगितले कि तुला एकदा बोललेले समजत नसेल तर मी सिक्युरिटीला बोलवून तुला बाहेर काढतो. तरी तो वाद घालू लागला कि तू कोण मला विचारणारा ? त्यावर बॉब बोलला मी इथला आर्किटेकट मीही तुझ्यासारखाच बेजन आहे , गोरा असलो तरी. हा माणूस इतक्या दुरून इथे आला आहे आपल्याला एक चांगले स्टेडियम बांधून द्यायला. मला अजिबात आवडणार नाही कि तो जाताना बार्बेडोसच्या लोकांविषयी म्हणजेच तुझ्या माझ्याविषयी वाईट गोष्टी मनात घेऊन जाईल.
लगेच सॉरी म्हणत तो अडखळत्या पावलांनी स्टेडियम बाहेर निघून गेला.
बापरे! देशभक्तीची पोकळ व्याख्याने ऐकलेला मी, इतकी रोखठोक देशभक्ती पाहून भारावून गेलो होतो.
साईटवर लावलेले पाइप्सचे स्कॅफोल्डिंग चुकवून जाताना बऱ्याचदा कसरत करावी लगे. एकदा अशाच एका फ्रेमखालून मी वाकून गेलो. बॉबने तीच फ्रेम चिंपांझीसारखे वरच्या बारला पकडून, अक्खे शरीर एका झोक्यात पुढे नेऊन पार केली. मी बघतच राहिलो. बॉब तुझे वय किती? त्याने सांगितले तो आकडा माझ्यापेक्षा दोन वर्षे अधिक होता !
“मी शारीरिक वयाला मनावर स्वार होऊ देत नाही. मन तरुण ठेवले कि शरीर झक मiरत तरुण राहते.”
बेजन लोकांच्या चिरतारुण्याचे रहस्य फक्त माउंट गे रम नाही तर हर फिक्र को धुवे में उडाता चला गया हि वृत्ती असते हे मला त्या दिवशी (पुन्हा एकदा) दिसले.
उसकापणीचा म्हणजे KADUMANT हा तिथला मोठा उत्सव. त्यावेळी निघणाऱ्या मिरवणुकीत निरनिराळ्या वेशभूषा करून लोक हिरीरीने सहभाग घेत. महिनाभर अगोदर स्थानिक कमिटीकडे नाव नोंदणी करून आपला ड्रेस वगैरे निश्चित करावा लागे. काही महत्वाच्या कामांची धांदल, हॅन्डीन्ग ओव्हर (आमचे बरेच जण याला हॅन्ड ओव्हरिंगही म्हणत!) चे टेन्शन यामुळे आणि त्यातही आपण शेवटी पाहुणेच या भूमिकेतून आम्ही कोणीच या भानगडीत पडलो नव्हतो.
मिरवणूक पाहायला मात्र मी आणि सुंदरन सकाळपासूनच मुख्य मैदानावर हजर होतो. निरनिराळ्या गावातून आलेले वेगवेगळे संघ आणि त्यांची रंगीबेरंगी वेशभूषा, गुलामीचे जोखड भिरकावून मुक्त झालेला बेजन समाज या साऱ्याचे देखावे पाहत असताना उन्हे वाढली तसे आम्ही रस्त्याने पुढे चालू लागलो. जागोजागी मिरवणुकीतल्या सहभागी कलाकारांच्या हातातले मग्स रिफील करायला बँक बियरच्या गाड्या उभ्या होत्या. रस्त्यालगतच्या घराबाहेर छोटेखानी स्टॊल वर सॉल्ट ब्रेड, फ्लायिंग फिश आणि मॉंटगे रम , पिनाकोलाडा हे विक्रीसाठी ठेवले होते आणि सर्वच जण त्याचा आस्वाद घेत होते. दुपारी अडीचच्या सुमारास आम्ही ब्रिजटाऊनकडे जाणाऱ्या हायवेला पोचलो तेव्हा जाणवले कि आज फक्त पिणेच सुरु होते, नाही म्हणायला खाऱ्या पावाची चव घेणे सोडले तर.
मिरवणूक सुरु होतीच. इतक्यात सुंदरचे लक्ष समोरून येणाऱ्या रोमन सैनिकाकडे गेले. तो पिसांचा मुकुट, कोपरापर्यंतचे धातूचे गार्ड्स , उघड्या अंगावर घातलेले कवच. कमरेला खड़ग आणि एका हातात ढाल ! उंचीला मात्र हा सैनिक थोडा शॉर्ट वाटत होता आणि हो, डोळ्यावर चष्माही होता! इन फॅक्ट त्यामुळेच तो बॉब असल्याचे समजले होते. सोबत एक मुलगा , मुलगी आणि बायको. सारे कुटुंब सैनिकी वेषात ! मी पुढे होत बॉबला हाक मारली आणि हस्तांदोलनहि केले. त्यानेसुद्धा हसत कुटुंबाशी ओळख करून दिली.
बार्बाडोस क्रिकेट असोसिएशनला स्टेडियम देण्याचा सोहळा होण्याच्या आधल्या रविवारी आम्ही सर्वाना पार्टीचे आयोजन केले होते. सिनिअर स्टाफचा वीला त्यासाठी तयार केला होता. स्थानिक मंडळींच्या आवडीचे फ्लायिंग फिश होतेच. मी बॉबला आग्रह केला कि फ्लायिंग फिश खाऊन पहा इंडियन मसाला लावलेले. हातातला रमचा ग्लास सांभाळत तो म्हणाला " फ्लायिंग फिश नेहमीच खातो. आज मी बासुमती राईस खाणार आहे. खूप ऐकले आहे पण चव कधी घेतली नव्हती.
मी म्हटले ,बॉब पुन्हा भेट कधी होईल सांगता येत नाही पण जेव्हा जमेल तेव्हा Do visit India, and of course Bombay "
"It 's Mum-bayy Satam ! तुम्हीच जर चुकीचे नाव घेतलात तर जगाला काय पडले आहे ?
Comments
Post a Comment