एमजीआर 


केवळ महिनाभराच्या संपर्काने माणूस लक्षात राहतो ? एमजीआर हे संक्षिप्त नाव. पूर्ण नाव  काय असेल याचा विचार करण्याची वेळच आली नाही. 

अर्थात तुम्हाला वाटते तो दक्षिणेतला चित्रपट गाजवणारा एमजीएआर नव्हे, तर हि व्यक्ती म्हणजे एक सरकारी ठेकेदार. माझ्या कुठल्याही बायोडेटात न आलेल्या कंपनीचा सर्वेसर्वा. पूर्ण एक महिना साईटवर काम करून (खरे तर एकवीस दिवस !) ती सोडण्याचा अनुभव मला देणारा माझा पहिला एम्प्लॉयर. 


झाले असे कि डिप्लोमा हासील केल्यावर कामाच्या शोधात असताना, एका ओळखीतून मला हि साईट मिळाली. उपनगरातल्या एका स्विमिंग पुलाचे आणि त्या संबंधित संकुलाचे काम होते ते. एका संध्याकाळी उशिरा गोवंडीला मी त्या साईटवर गेलो आणि आमच्या त्या नातेवाईकाने एमजीआरसोबत  माझी ओळख करून दिली.  


रमेश देवसारखा केसाचा कोंबडा, निमगोऱ्या चेहऱ्यावर ट्रिम केलेली मिशी आणि गुळगुळीत दाढी . बोलताना डोळे  मोठे करायची सवय. नाव दाक्षिणात्य असले तरी अस्खलित मराठी बोलणे. 

"साहेब तुम्ही काळजी नका करू. याना उद्यापासूनच येऊ दे साईट वर, मी सर्व समजावतो."

असे सांगून त्याने एकाला बोलावले आणि तमिळमध्ये काही सूचना केल्या . त्यातले सार इतकेच मला नीट समजले.


दुसऱ्या दिवशी मी लवकरची ३७४ बस पकडून साईटवर गेलो. पुलाचे काम सुरु होते. मला सिनियर असलेले इंजिनियर देशपांडे आणि वॉचमन परब हे दोघे सोडले तर साईटवर मी तिसरा मराठी !  बाकी सर्व सुतार, गवंडी, स्टील फिटर हे दाक्षिणात्य तरी किंवा बंगाली होते. क्लायंट कडून असलेले वाणी म्हणून कुणी ऑफिसर क्वचितच उगवत. 


सकाळी बरोबर साडेनऊला गेटवर हॉर्न वाजला कि एमजीआर आल्याचे साईटला समजे आणि मग गेटमधून आत येता येता सर्वांची हजेरी सुरु होई. बरे आवाज असा टिपेचा कि उंचावरच्या चालू कामातल्या स्लॅबवरचा कामगारही दचकला पाहिजे. 


" हे बघा, इथे आपण कामगार आणतो ते टाइमपास करायला नाही. त्यांच्याकडून काम काढायला शिकले पाहिजे. आधी ड्रॉईंग समजून घ्या, साईटवर फिरताना दिशा समजली नाही तर लफडे होईल आणि मला ते चालत नाही. समजले ? "

साधारण तिसऱ्या दिवशीच मला या समजले ने शेवट होणाऱ्या निदान पन्नासेक प्रश्नांना तोंड द्यावे लागले होते.

 

ते दिवस लाकडी मुंढ्यांच्या सपोर्टवर स्लॅब लावण्याचे होते. एका जागी मला एक मुंढा सैल वाटला. मी कार्पेन्टरला समजावत असतानाच एमजीआर तिथे उगवले. "अरे कशाला त्याला समजावत बसलाय? एक लाफा मारा, पुन्हा अशी मिस्टेक होता कामा नये !"  कटाप्पाच्या  देहयष्टीच्या कार्पेन्टरला मी लाफा 

मारणार? मी बावचळल्यागत उभा राहिलो. मला लाफा मारणे याचा हार्ड स्लॅप हाच अर्थ माहिती होता. मग मला समजले कि त्यांना म्हणायचे होते, त्या लाकडी मुन्ध्याच्या खाली एक दुसरा लाकडी तुकडा वेजसारखा (पाचर ) मारला कि तो न हालता भक्कम उभा राहील. डिप्लोमाला कम्युनिकेशन स्किल या विषयात लांबे चवडे इंग्रजी निबंध लिहिण्या ऐवजी साईटच्या भाषेचा अभ्यास केला तर किती छान होईल?


भाषेवरून आठवले.  एमजीआर हा बॉर्न तामिळ, शिक्षण इंग्रजी शाळेतले, बायको गुजराथी, कामानिमित्ताने मराठी अधिकाऱ्यात उठबस.  यामुळे या वल्लीला दक्षिणेतल्या सगळ्या भाषा, मराठी, गुजराथी, इंग्लिश, हिंदी हे सर्व नीट बोलता येत असे. निरनिराळ्या लेबर काँट्रॅक्टरना झाडण्यासाठी त्याला हा  बहुभाषी हुनर  खूपच कामी येई . 


पावसाच्या सुरवातीला, अचानक एक दिवस बातमी आली कि मुंबईवर प्रचंड वेगाने वादळी वारे येणार आहेत. त्यावेळी एमजीआरचे आणखी एक वेगळे रूप मला पाहायला मिळाले. संपूर्ण साईटवर असलेले सुटे मटेरियल उचलून एका जागी नीट ठेवणे, लेबर कॉलनीतल्या झोपड्यांवर असलेले पत्रे उडू नयेत म्हणून वाळूच्या गोण्या ठेवणे, वगैरे गोष्टीत नुसत्या सूचना  देत न राहता त्याने शेवटपर्यंत ठीकठाक आहे ना याची खात्री करून घेतली होती. 

वादळ आले, जरा थांबले आणि आंध्र कडे सरकले.  पण दक्ष कसे राहावे याचा प्रत्यक्ष धडाच मला या घटनेने मिळाला. 


का कोण जाणे पण डोक्यात काहीतरी किडा  येऊन मी दाढी वाढवली होती. वाशीला स्वतःचा बंगला बांधण्यात व्यस्त असलेला एमजीआर पंधरा दिवसांनी पहिल्यांदाच  साईटवर आला होता. मला पाहिल्यावर म्हणाला "दाढी वाढवता ? चांगले आहे. कामगार जरा घाबरून राहतात.!"


स्विमिंग पुलचा राफ्ट भरायच्या रात्री समजले कि साठ माणसांसाठी रात्रीचे खाणे अरेंज झाले नव्हते. मी व्हायब्रेटरची नीडल चेक करीत होतो. इतक्यात लेबरच्या सुपरवायझरने हे येऊन सांगितले. रात्री अकरा वाजायला आले असताना कप्पाळ जेवण मिळणार होते?  पण समस्या आली आणि एमजीआर हरला असे कुणी कधी पहिले नव्हते. "अरे तो कोपऱ्यावर वडापाववाला आहे ना ? त्याला सांगा .काम होऊन जाईल.  त्या रात्री साईटवर शंभरेक वडापाव आले होते, दोन वेळ आणि सोबत गरम गुलाबी चहा.  


एमजीआर शेठच्या मुलाच्या वाढ दिवशी अक्ख्या साईटला मिठाईचे बॉक्स दिले जात. मला ते थोडे विचित्रच वाटले होते तरी अकौंटंटला बरे वाटावे म्हणून घेतला बॉक्स." वो लडका कितना बडा है? कभी आया नाही साईटपर ?और आज एमजीआर तो घरपर हि रहते है क्या?:"या  माझ्या प्रश्नावर अकौंटंन्टच्या डोळ्यात टचकन पाणी तरळले . " अरे वो स्टोरी आपको मालू नई . सेठका लडका चार साल पैले इसी दिन कारके नीचे आया. उस्का बाद सेठ हर बड्डेको ऐसाच सबको स्वीट डिस्ट्रीबुट करता.  वो आज मॉर्निंग को मंदिर गया होगा मुरूगनस्वामीका. उधर भी बहोत डोनेशन गिनेशन दिया सो "


एमजीआरकडे काम करण्यासाठी मला इतर काहीच त्रास नव्हता. पण देशपांडेंना चक्क रिझर्व्ह बँकेत जॉब मिळाला आणि कॉलेजातून ताजा बाहेर पडलेला असताना, एवढ्या अमराठी लोकात राहणे मला जमेना. 

त्यात त्याचा भाचा कामासाठी आला खरा पण त्याचे मुख्य काम हे इकडचे तिकडे पोचवणे आणि दोन माणसात भांडण लावून मजा पाहणे हेच होते. मी सारासार विचार केला कि इथे आपले काही खरे नाही. 


साईट आणि अर्थात कंपनी सोडायची त्यासाठी एमजीआरकडे प्रत्यक्ष बोलायचे मला धाडस होईना. काय कारण सांगणार होतो साईट सोडण्याचे? मराठी माणूस साईटवर नाही तेसुद्धा भर  मुंबईत ?  एमजीआरचे मराठी ऐकून कोणाची हिम्मत झाली असती याची मातृभाषा मराठी नाही म्हणायची? तरीहि  मला काहीतरी 

कामासाठी गावाला जायचे आहे म्हणून एक आठवडा येणार नाही असे ओझरते बोललो होतो.


पब्लिक फोनवरून दहा पैशाची तीन नाणी टाकत मी आमच्या नातेवाईकाशी बोललो कि "माझे इथे मन लागत नाही. काय करू? तुला कळवावेसे वाटले."

तो सरकारी खुर्चीत आणि तेही बरीच वर्षे काढलेला होता  " अरे असे काही नाही.  त्याला माणूस हवा होता तुला जॉब हवा होता.  बिन्धास सोडून जा."


नेमके त्या दिवशी काही मीटिंगमुळे एमजीआर साईटला येणार नव्हता. हातानेच एका कागदावर राजीनामा खरडून मी अकौंटंटला दिला. काही न बोलता त्याने माझा हिशोब केला . चारशेवीस रुपयात एकवीस दिवसांचा अनुभव घेऊन त्या दिवशी मी साईटच्या गेटबाहेर पडलो. त्यानंतर मात्र पुन्हा आजतागायत माझी एमजीआरशी भेट झाली नाही.


Comments

Popular posts from this blog

तीन मंहमद

महर्षी रेमेडीओस