वासू
वासू म्हणजे वासुदेव मोहंती. जोगेश्वरीच्या क्रीडा संकुलाच्या कामावर माझ्यामागून आलेला हा दुसरा माणूस. म्हणायला लेबरच पण शार्प डोक्याचा होता.
साईटवर कामासाठी येताना तो वर हाफ बुशशर्ट आणि खाली ढोपरापर्यंत गुंडाळलेली निळ्या रंगाची टीपीकल ओडिया खसरा लुंगी लावत असे.
केस वाढले कि डोकेदुखी होत असल्याने त्याचे डोके नेहमीच क्रू कट दिसायचे.
त्यावेळी आमची साईट म्हणजे एक मोठा खड्डा होता आणि त्यात पावसाचे पाणी साठल्यावर तर गच्च पानवेलींचे जाळे पसरलेले असे. पाणी जास्त खोल नसले तरी गमबूट घालून चालावे लागे. अशा किचकट जागी वासू माझ्यासोबत लेव्हल्स घेण्यासाठी लेवलिंग स्टाफ घेऊन उभा राही. मातीचा भराव टाकण्यापूर्वी घ्याव्या लागणाऱ्या या लेव्हल्स साठी त्याला सक्त ऑर्डर होती कि स्टाफ चांगला दाबून धरायचा आणि हे काम तो इमाने इतबारे करीत असे. अगदी क्लायंटकडून चेकिंग होत असताना दूर उभा असलेला वासू स्टाफ जमिनीत खोवून धरताना दात ओठ खात जो चेहरा करायचा तो मला टेलेस्कोपमधून दाखवत क्लायन्टने पावतीसुद्धा दिली होती कि तुम्ही सर्वे हेल्परला ट्रेनिंग चांगलेच दिले आहे!
वासू आमच्या आधीच्या म्हणजे ट्रॉमबे साईटवरून आलेला. सुरवातीला तो ये जा करीत असे पण ती साईट संपल्यावर मात्र त्याने आपला छोटा संसार घेऊन जोगेश्वरी साईटवर झोपडे बांधले. साईट जसजशी आकार घेऊ लागली,इतर लेबर आणि मेसन सुतार वगैरे लोक वाढू लागले तसे वासू पंधरा दिवस गावी जाऊन त्याच्या बायकोलाही घेऊन आला. आता त्याला जेवणाचे बघावे लागत नसल्याने तो सकाळी लवकर येऊन संध्याकाळी अंधार होईपर्यंत या सर्व्हेसाठी माझ्यासोबत असे. अर्थातच दुपारच्या उन्हावेळी मी त्याला चांगली दोन तास सुट्टी द्यायचो कारण उन्हात मलाही त्रास नको होता.
भरावाच्या मातीचे डंपर्स येण्याचे प्रमाण वाढू लागले होते. साईटच्या दुसऱ्या बाजूने पाइलिंगच्या कामालाही सुरवात झाली होती. त्या काँट्रॅक्टरला कामाच्या जागी
१६मिली साईझच्या स्टील सळईने पॉंईंट द्यावा लागे. साहजिकच मग लेव्हल्स बरोबर थिओडोलाइट चा वापरही सुरु झाला आणि आमच्या सर्वेच्या कामाचा लोड वाढला. दुसऱ्या लेबरला शिकवत बसण्याऐवजी वासूकडूनच दोन्ही कामे करणे सोयीचे पडत होते. वासू तसा कामचुकार नव्हता पण कधीकधी तो थकून जायचा
डोक्याकडे हात नेत त्याने सरेss असे म्हटले कि समजायचे याची बॅटरी डाउन झाली आहे. मग मी त्याला थोडावेळ रूमवर जाऊन पड सांगायचो आणि तात्पुरत्या ठोकलेल्या शेड मध्ये बसून माझी कॅल्क्युलेशन्स करायचो.
आमचे साईट मिक्सर, काँक्रीटची लागणारे व्हायब्रेटर यासोबतच ब्याचिंग प्लांट उभारणीमुळे साईटवर आता इलेक्ट्रिशिअन आणि मेकॅनिक्स सुद्धा वाढले.
लेबर कॅम्पमध्ये फॅमिलीज वाढू लागल्या. मेल कुली बरोबर रेजा म्हणजे स्त्री-कामगार दिसू लागल्या. आमची इंजिनीरिंग टीम कामाप्रमाणे वेवेगळ्या शेड्समध्ये बसायला सुरवात झाली. साईटचा कोनाकोपरा ठाऊक असलेला वासू आता सर्वाना हवाहवासा वाटू लागला. गावाकडे तो सातवीपर्यंत शिकलेला असल्याने इतर ओडिया लेबरसारखा आग्या असे न म्हणता सर म्हणायचा. त्याचे गणितही उत्तम होते फक्त तोंडी हिशेब तो उडिया भाषेत करायचा आणि उत्तर सांगताना हिंदी किंवा इंग्लिशमध्ये बोलायचा. वासूने काँक्रीटच्या क्वांटिटीचा अंदाज कोडी पर्ज्यांत काढला कि वीसपर्यंत हे मला सवयीने समजू लागले होते.
प्रोजेक्टच्या भूमिपूजनापासून साईटवर असल्याने मला सुट्टी घेता आली नव्हती. आता पुरेसा स्टाफ आहे आणि गावी जायचेच आहे असे बॉसना पटवून मी महिनाभरासाठी कामावर गेलो नव्हतो. परतल्यावर मला साईटवर जसे बदल जाणवले तसाच बदल वासूच्यात दिसला. तो सतत कसल्यातरी विचारात गढलेला दिसायचा. एखाद्या ठिकाणी स्टाफ धरून उभा राहिला कि मी पुढे गेलो तरी हा त्याच जागी रेंगाळू लागला. आधी मी दुर्लक्ष केले पण सारखे सारखे किती हाक मारून बोलावणार म्हणून त्याला समोर बसवले आणि विचारले
क्या बासू क्या प्रॉब्लेम है तेरा? पहले जैसा ध्यान नहि काम पर तेरा ? वासूचा हात डोक्याकडे गेला.
सरेss एक कथा करनेका था
बोलो क्या हुआ? सुना तेरेको बच्चा हुआ इधर ? सब ठीक तो?
सरेss वोही प्रॉब्लेम. वो बच्चा मेरे जैसा नहि करके सब लोग बोलता है. क्या सच्ची कोई गडबड किया क्या?
अरे कुछ भी मत सोचो. तुम तो तुम्हारा बिविको जानता है ना? ऐसा कुछ दिमागमें मत रखो और काम पर ध्यान दो .
मी हि गोष्ट विसरूनही गेलो होतो पण वासूचे तंद्रीत राहणे वाढू लागले. हल्ली तो बऱ्याचदा साईटवर थोडी घेऊनही येत असे. मुळातच बारीक असलेला वासू अधिकाधिक खंगत चालला होता. हल्ली त्याने साईटवर येताना थोडी घ्यायलाही सुरवात केली होती. मलाही समजेना नक्की काय गडबड आहे. मग मी माझ्या पद्धतीने तपास केला आणि जे समोर आले ते धक्कादायक होते. झाले असे कि एक मेकॅनिक जो जास्त नाईटशिफ्ट करायचा त्याने वासूच्या गैरहाजिरीचा आणि भोळेपणाचा फायदा घेत वासूच्या बायकोला फितवले होते. हा पट्ठ्या दिवसा रूमवर आराम करतो म्हटल्यावर त्याचा संशय कुणाला आला नव्हता.
अर्थात हे सर्व वासूला कुठूनतरी कळल्यापासून संशयकल्लोळाच्या पिशाच्चाने त्याला पुरते पछाडले होते. हजारभर लेबरअसलेल्या साईटवर निदान वीसेक मुले तरी नक्कीच जन्मलेली, त्यातच एक वासूचा मुलगा. त्या मेकॅनिकला दुसऱ्या साईटवर पाठ्वण्यापलीकडे इतर काही करणे शक्य नव्हते कारण ठोस पुरावा काहीच नव्हता आणि वासू आपल्याला काही करणार नाही हे त्याच्या बायकोला चांगले ठाऊक होते.
प्रोजेक्टची पहिली स्लॅब माझ्याच बिल्डिंगची. कामाच्या धांदलीत वासू आला नाही हे माझ्या ध्यानातून निसटले. स्लॅबचे चेकिंग, काँक्रीटची तयारी, काँक्रीटची पूजा वगैरे सर्वातून मी मोकळा झालो तेव्हा दुपार झाली होती. काँक्रीट सुरु करून मी खाली उतरलो. साईट ऑफिसमध्ये गेलो तेव्हा अकाउंटंट भेटले.
क्या साब आपका वासू गाव गया अचानक?
अरे मुझे कुछ बोला भी नही. ऐसा क्या हुआ?
वो गया, साथ में बीवी बच्चा को भी ले गया. आपके लिये ये चिट्ठी छोडा.
जुन्या संपलेल्या लॉगबुकच्या पाठकोऱ्या पानावर वासूने चिट्ठी लिहिली होती.
उडिया लिपीत लिहिलेल्या त्या चार ओळींचा अर्थ मी माझा सुपरवायझर दासकडून विचारला.
"सर वो लिखता है कि अभि साईटपर मन नाही लागता इसलिये गाव जाके खेती करेगा.
आपको थँक्स बोला है और किसीके लिये कुछ डाउट नही ऐसा लिखा है !"
Comments
Post a Comment