आर वेलू                       

                      

मूर्ती लहान पण कीर्ती महान ही म्हण  ज्या व्यक्तींवरून तयार झाली असेल त्यातील अग्रेसर म्हणजे राघवेंद्र वेलुस्वामी , साईटवर आणि कंपनीत फेमस असलेला  कार्पेन्टरी फोरमन आर वेलू. 


कमी उंचीमुळे त्याला साईटवरच्या पाईप परांचीखालुन लीलया वावरत येत असे. साधारण ठेंगू माणसांमध्ये ठळक दिसणारा गुण म्हणजे मान वर करून बोलणे ज्यात थोडी उर्मटपणाची झाक असते , तो वेलूमध्ये   क्वचितच दिसे. कार्पेन्टरी शेडमध्ये, खुर्चीत एक फोमची शीट ठेवून त्यावर  बसला  कि मात्र समोरच्याच्या नजरेला नजर भिडवून बोलण्याची सवय होती.


रोज स्वच्छ सफेद शर्ट घालणे या माणसाला कसे जमते हे कोडे पडावे . कंपनीतल्या माझ्या तेवीस वर्षांच्या सर्व्हिसमध्ये साताठ  साईटवर त्याच्यासोबत काम करताना फक्त एकदाच , माझ्या वीस वर्षांच्या सर्व्हिस अवॊर्डवेळी आर वेलूला   त्याचा पस्तीस वर्षांचा सर्वीस अवार्ड घेताना जबरदस्तीने सूट , वेगळे बूट आणि टाय अशा खास वेषात पाहिले होते. एरवी कायम सर्वात लहान साईझचे सेफ्टी शूज आणि इन केलेला सर्फ छाप शुभ्र फुल्ल शर्ट.  रापलेल्या शिसवी रंगावर तो उठूनही दिसे. हेल्मेटखाली चेहरा सुरु होण्याआधी प्रकर्षाने जाणवायचे ते आडवे भस्म !


कंपनीच्या रंगीत बुलेटिनमध्ये चमकणारे बहुतेक साहेब त्याच्यासमोर उमेदवारी करून गेलेले होते. त्यामुळे अमुक अमुक नाव निघाले कि 

"वो साब? उसको तुमलोग साब बोलता होगा, मेरा सामने वेलू सर बोलके बात करेगा. कंदीपा ! " यातले कंदीपा म्हणजे खात्रीने हे जरा ठसक्यात बोलले जाई . 


ओतल्या जाणाऱ्या  काँक्रीटला, ते सेट झाल्यानंतर हवा तो आकार आणि फिनिश मिळण्यासाठी शटर किंवा फॉर्म हे कसे बनवायचे, त्यासाठी काय काय वापरायचे हे इतकी वर्षे लोणच्यात मुरलेल्या बेडेकरांसाखे त्याच्या हातखंडा फॉर्मुल्याने त्याला  ठाऊक होते. मी फॉर्म बनवला ,तो तुम्ही कसाही वापरा अशी लिमिटेड वृत्ती मात्र नव्हती. मोठ्या काँक्रीट वेळी आर वेलू स्वतः साईटवर चक्कर मारी  , प्लाय मागे जोडलेल्या एच बीम वर पडलेले काँक्रीट जर वेळच्यावेळी साफ नाही  केले तर त्या काँक्रीट फोरमॅनला तर ओरडेच पण त्याचबरोबर लेबर काँट्रॅक्टरच्या कुळाचा उद्धारही करी. 

"साला तुमारा आप्पा  इतना साल येही कंपनीका खाया, चाया पिया लाईन तुम छोकरा लोग एल्ला सत्यानास करता !" आणि हे बोलताना एखादा लाकडाचा तुकडा हाती घेऊन उगारलेला दिसे.  

 पण हा माणूस बाहेर कितीही कठोर दिसला तरी अंतरी खूप दयाळू होता. प्रजापती  शर्मा हा आमचा मुख्य फॉर्मवर्क ठेकेदार. मुलाच्या लग्नासाठी गावाला गेला आणि बारातमध्ये घोडी उधळल्याने मागून येताना लाथ बसून जागीच निधन पावला. त्यावेळी आमची अडतिसावी स्लॅब चालू होती. बातमी साईटवर आली तेव्हा सर्वानाच धक्का बसला . आरवेलूने मात्र लगेच अकाउंटंटचे ऑफिस गाठले. 

"सार , मेरा आऊट ऑफ पॉकेट एक्सपेन्स से हजार रुपीज निकालके अलग करो. ना पेरिया सार किट पेशरा (मोठ्या सायबाशी मी बोलतो )

 आ मेले (याच्याउप्पर) किसको कितना पैसा देनेका वो देने दो , लेकिन उस्का घर मे पैसा  जल्दी पोंचना !  साला वो मर गया वो कॉन्ट्रॅक्टर इल्ला, अमारा फ्यामली मेम्बर. "

संध्याकाळच्या आत साईटवरून पन्नासेकहजाराची मदत शर्माजींच्या नावे जमा झाली. 


साईट सेफ्टीसाठी सेफ्टी मॅनेजरपेक्षाही काटेकोर असणारा वेलू  स्वतः स्मोस्किंगपासून दूर राहू शकत नव्हता. त्यामुळे जेव्हा जेव्हा तलफ येई तेव्हा तो आठवणीने आपल्या वर्कशॉपच्या बाहेर , एखाद्या कोपऱ्यात उभा राहून पफ घेई आणि मागे वळताना खाली पडलेले थोटूक बुटाने चिरडून विझवून टाकत असे.  हॅलोजन लाईटच्या उष्णतेने  कॉटन वेस्टच्या गोणीला आग लागली आणि दुसऱ्या दिवशी काँक्रीटला तयार असलेली स्लॅब जळून खाक झाल्याची स्टोरी तो सांगत असे. अर्थात त्यांनतर कंपनीच्या  सम्पूर्ण साइट्सवरून हॅलोजन लाईटला बंदी घातली गेली. आताशा कॉटन वेस्टऐवजी ग्रीस सिमेंट मिश्रण फॉर्म्सच्या फाकलेल्या सांध्यात भरायचा एसओपी सगळीकडे अनुसरला जात होता आणि त्यामागे वेलूसारखेच दक्ष जुने जाणते फोरमन होते. 


एका सही पलीकडे आणखी  इंग्लिश लिहू वाचू न शकणारा वेलू ड्रॉईंग वाचण्यात मात्र एक्सपर्ट होता. वर्कशॉपमध्ये एका कोपऱ्यात एक तिरका बोर्ड व्यवस्थित स्टँडला लावलेला असे ज्यावर पूर्ण मोठे ड्रॉईंग पसरवून वाचता येत असे. कुण्या नवख्या स्टाफने ड्रॉईंग वाचताना कधी सेक्शन समजण्यात चूक केली कि वेलूचे पित्त्त खवळत असे.  "एंन्ना माईरा?  साला इंजिनियर बन गया. ओरु सिम्पल ड्रॉईंग पडनेको नई आता ! सार (मला त्याने कधीच नावाने हाक मारली नाही. ) ,

ये लोगके लिये क्वालटी मे प्रोग्रॅम रखना .  अम आयेगा सिखानेको कैसा देखने का ड्रॉईंग."


एक फुटापेक्षा जास्त रुंदीच्या शियर वॉल्सच्या कॉंक्रीटिंग दरम्यान न चुकता एका लेबरला फ्री ठेवण्याकडे त्याचा कटाक्ष असे. या माणसाच्या हाती एक लाकडी मॅलेट (गुटका) देऊन शटर ठराविक जागी बाहेरून ठोकले कि सिमेंट पेस्ट सर्वदूर पसरून , शटर उघडल्यावर गुळगुळीत फिनिशची खात्री मिळे. 


त्याचप्रमाणे, उंच वॉल्सच्या सांध्यामध्ये पेन्सिल जॉईंट कसा ठेवायचा यासाठी त्याचा एक खास जुगाड होता. खालच्या फॉर्मच्या टॉपला एक इंचाची एक चावी ठोकली कि ती दुहेरी  काम करायची. एक तर स्टील बारला चांगले कव्हर मिळाल्याने त्या भागात काँक्रीट नीट जाऊन भरत असे. दुसरे म्हणजे , त्या चवीच्या जागी एक छान खाच तयार होई.  पुढल्या लिफ्टच्या वेळी शटर थोडे खाली फिक्स केले जेणेकरून वरचा फॉर्म त्या खाचेला झाकून टाकेल आणि मग सपोर्ट व्यवस्थित टाईट केले कि निव्व्ळ एक साधी लाईन दिसायची सांध्याच्या जागी 


बेचाळीस मजले पूर्ण होता होता इमारतीचा परिसर क्लायंटला इतर एजन्सीच्या कामासाठी  देण्याच्या हालचालींना वेग आला होता. माझ्या क्वालिटी लॅबचा  टेस्ट क्यूब ठेवण्याचा टॅंक तोडावा लागणार होता. इतके क्यूब ठेवायला परत कुठे टॅंक बांधणार यावर वेलूकडे सोपे उत्तर होते. दोन बंचिंगप्लांट साईटवर सतत सुरु असल्याने काँक्रीट ऍडमिक्सचे बरेच रिकामे पीव्हीसी ड्रम्स होते. त्यातले दहा कापून म्हणजे अर्धे करून सलग लावल्याने छानपैकी लिकप्रूफ क्युरिंग टँक्स तयार झाले. 


विश्वकर्मा पूजा हा साईटवरचा उत्साहाचा सण .  आर वेलूच्या कार्पेन्टरी वर्कशॉपचा स्वतंत्र मांड असायचा. त्यादिवशी होणाऱ्या होमावेळी वेलू खास स्पिरिच्युअल मूड मध्ये असे. बाबा विश्वकर्माकी  जय म्हणून नारळ वाढवतानाचा त्याचा जोश वय विसरणारा असे. 


सेवानिवृत्तीनंतर काय हा प्रश्न पडण्यापूर्वीच वेलूने  आपल्या थोरल्या मुलाला इंजिनियर करून कंपनीच्या डिझाईन ऑफिसमध्ये रुजू केले होते, तेही प्रॉपर चेन्नईला.  "सार ,मैं मेरा पय्या (मुलगा)को बताया, तुम अप्पा से बी अच्छा काम करके पेरिया (मोठा) ऑफिसर होना." मुलीच्या लग्नासाठी लागणारे सोने बाजूला ठेवले आहे  आता फक्त आम्हा दोघांच्या मेडिकल पुरते पैसे मिळाले तरी आनंद आहे असे माझ्याकडे  बोलून दाखवले. 


 उठता बसता येते तोवर काम करत राहायचे हा त्याचा खाक्या होता. 

"सार को मालूम . ये बॉडी प्लायवूड का स्टॉक जैसा एक जगा पर रखेंगे तो फालतू में खर्चा  हो जायेगा ! उस के बदले काम करेगा तो लास्ट तक  काम आयेगा! बगवान ने आदमी बनाके बेजा उसको बी अच्छा लगेगा "

हे त्याचे जीवनसार मात्र सर्वानीच लक्षात घेण्यासारखे होते. 


Comments

Popular posts from this blog

तीन मंहमद

महर्षी रेमेडीओस