दिलावरमामा
दिलावरखान हा पठाण. त्याच्यासोबत आणखी वीसेक पठाण असलेला त्याचा मोठा लेबर फोर्स हा आमच्या
जॉर्डन सीमेलगतच्या हॉस्पिटल प्रोजेक्टवर एचव्हीएसी काम करणाऱ्या एजन्सीकडे होता. साधारण जोहरच्या
प्रार्थनेपर्यंत त्यांचा कामाचा दिवस असायचा. अलबत त्यानंतर तो आमच्यासाठी हातमेहनत करायला मोकळा
असे या देहाडीच्या म्हणजे अधिकच्या कमाईमुळे तो साईट मॅनेजर आणि स्टोरकिपर यांच्या फोनवर आपली
फौज घेऊन धाव येई.
जंजीर सिनेमातल्या प्राणला अचानक फुगवला आणि साहजिकच उंची कमी केली कि जसा दिसावा तसा हुबेहूब
दिलावरखान दिसायचा. दाढी मात्र केसांना मॅच करणारी शुभ्र रुपेरी. नो मेंदी व इतर काही. बहुतेकदा त्याचे कपडेसुद्धा
या सर्फ सफेद केसांसारखेच असत. पश्तू ढंगाने उर्दू बोलताना त्याचे दा दा (होय होय ) ऐकायला नादमधुर वाटे.
फुल्ल बाह्यांच्या खमीजखाली लोम्बणाऱ्या नाडीला बांधून ठेवणारा एक मण्याची मला सुरवातीला गम्मत वाटायची पण हळूहळू
लक्षात आले कि हा त्यांच्या पेहेरावाची खासियत आहे.
दमामहुन ट्रेलरने आलेले टाइल्सचे बॉक्सेस असो वा इतर असे बरेच सामान जे फोर्कलिफ्ट आणून सांभाळत आत ठेवणे त्रासाचे आणि
महागही पडे अश्या कामासाठी दिलावरखानची गॅंग कामाला येई. नुसते "दिलावर जरा आ जाओ " असा निरोप गेला कि दिलावर खान
आणि सेना हाजीर होई. सामानाचा अंदाज घेऊन मग ते कसे हाताळायचे याची इंस्ट्रुक्शन्स दिली जात. निदान दोनचार पठाण तरी
काय आदेश मिळाला हे न समजल्याने काहीतरी परत विचारत . मग दिलावर स्वतः त्या बॉक्सला हात घालून उचलून दाखवत असे आणि
तसेच समोरच्या पठाणाने केले कि खुश होऊन त्याला दा दा म्हणत असे.
त्याचा एक भाचा या टोळीत होता. बहुतेक तो टोळीमध्ये सर्वात उंच होता. एकदा मला काही सर्वे आणि लेव्हल्स साठी एका लेबरची जरुरी होती.
दिलावरकडे बोलल्यावर त्याने लगेच या भाच्याला बोलावले. पाच दहा मिनिटे मला अगम्य पश्तुत त्याला समजावल्यावर जहांगीर म्हणजे तो भाचा
दा दा म्हणायला लागला.
मी विचारले इस्को बराबर बताया ना ?
"आप बे फिकर रहो . आम इस्को बोला कि जैसा मूहांडीस साहब (इंजिनियर) बोलती वैसा काम तुम करो"
दुसऱ्या दिवशी साईटवर जहांगीरला साईटवर नेले आणि ज्या जागी मातीचे फक्त ड्रेससिंग करायचे होते तिथे त्याला दाखवले कि बाबारे
या एवढ्या भागात (टेपवर दाखवून ) फक्त चार ते पाच इंच माती खरवडून काढायची आहे.
"अंजिनियर साब आमको पढना नहि मालूम. एक मागास (माप) दे दो. " असे म्हणून तो एक लाकडाची काडी घेऊन आला. त्यावर मी माप घेऊन
त्याला मार्क करून दिले आणि या मापाप्रमाणे कर सांगून मी माझ्या कामात गुंतलो.
संध्याकाळी त्या जागी परतलो तेव्हा या बाबाने एक खड्डा केला होता आणि इमारतीचे फौंडेशन उघडे केले होते !
मी उडालो. "जहांगीर ये क्या किया?"
"तुम खुदाई करनेको बोली आम पसिना पसिना किया. देखो अमारा शावल (बेलच्या) बी तूट गया. "
"अरे लेकिन तुमको एक मगास दिया था ना सुबहको ?"
"वो तो किदर गुम हो गया मालूम नाही"
मला समजले कि मी एका उंचापुर्या रोबोशी डील करीत आहे, आणि याला आताच आवरले नाही तर हा अक्खी बिल्डिंग खुली करेल.
मग मी सरळ समोरच्या दुकानातून त्याला दोन पेप्सी आणायला सांगितले, एक मी प्यायलो एक त्याला दिला आणि सहज टेपने रिकामा कॅन मोजला
तर बरोबर १२५ एमएम !
"जहांगीर , ये डब्बा पकडो , जमीनपर रखके उतनाही मट्टी निकालो . डब्बा आडा नाही, खडा रखना " मला कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती ,
दुसऱ्या दिवशी जहांगीरने तो पॅच व्यवस्थित ड्रेससिंग करून दिला. पेप्सीने चोख काम केले होते.
मजबूत देहयष्टी आणि उंची देता देता उपरवाला डोक्यात काही भरू शकला नाही अशी जहांगीरच्या अवस्था. हा गावी पण असाच राहायचा म्हणून
दिलवरमामा त्याला सौदीला घेऊन आला होता. दिवसाचे शंभर रियल मिळतील या बोलीवर त्याला साईटवर कामाला पाठवले होते. संध्याकाळी चहा
घेत मेसमध्ये बसलो असताना हा धिप्पाड माणूस मेसच्या दरवाजात हजर.
"इंजिनियरसाब मेरा रियल दो "
"अरे वो मामा को मिलेगा ना, वो तुमको दे देगा "
"नई नई, आम काम किया, मामा को किस वास्ते देगा शारिकत (कंपनी)?"
मला त्या क्षणी पठाणाचे कर्ज म्हणजे काय ते नीट समजले! मी त्याच्या शंभर रियलची व्यवस्था केली.
इफ्तारच्या पार्टीवेळी दिलावर खास तमामी खबुस, बकरेका सालन आणि टोपभर बिर्याणी घेऊन आला . आमच्या तब्येतीच्या
चार जणांना पुरणारा तो पठाणी खुबूस एकेक पठाण लीलया संपवत होता.
एकदा मेसचा गॅस संपला म्हणून मला गावाबाहेरच्या गॅसवाल्याकडून सिलिंडर आणायचे होते. गाडीचा गोंधळ असल्याने मी दिलावरकडे बोललो कि गाडी मिळाली असती तर बरे झाले असते.
"फिर आम लोग किस लिये है ? चालो मेरे साथ "
त्याने लगेच स्वतःची पीकप आणली, पुढल्या अर्ध्या तासात आमचे जेवण नवीन सिलिंडरवर शिजत होते.
कडकडीत रोजे सांभाळत अंगमेहनत करणाऱ्या या पठाणांची कमाल वाटे.
सौदी म्हणजे फक्त वाळू असा गैरसमज घेऊन भारतातून आलेल्या माझ्यासारख्यांचा इथले चिवट दगड जॅक हम्मर वापरून तोडावे लागतात
हे सांगून विश्वास बसला नसता. पण पूर्ण उपाशी राहून, घामाने निथळत असे काम करणारे पठाणहि पहिले आहेत.
हॉस्पिटलची मुख्य इमारत हॅन्ड ओव्हर झाल्यावर दिलावरची गॅंग बऱ्यापैकी मोकळी झाली. साईट आवरण्याच्या कामात मग त्याची इन्व्हॉल्व्हमेंट वाढू लागली
कारण बरेचसे सामान लेबरकडून हाताळणे सोयीचे होत असे.
प्रिफ्याब स्टोर तोडून झाल्यावर त्याचे पार्टस उचलून एका बाजूला रचले जात होते. दिलावरखान स्वतः देखरेख करीत होता. मी गमतीने म्हटले
"दिलावर ,तुमारा तगडा फौज राहेगा तो पुरा मुस्तशपा (हॉस्पिटल) इधर से उधर कर सकते है !"४
"कोई मुश्किल नही इंजिनियर साहब . दो दिन लगेगा . पठाण का जुबान !!"
दिलावर खान खुप भावला.आपले सगळे अनुभव तुम्ही अत्यंत जिवंतपणे मांडता.खूपच ओघवते लिखाण.
ReplyDelete